मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; जिल्हाधिका-यांची गोपाळखेड येथील शाळेला भेट

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; जिल्हाधिका-यांची गोपाळखेड येथील शाळेला भेट
लोकसहभागातून शाळा समृद्ध कराव्यात – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 30 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळांमध्ये आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा अधिकाधिक सुंदर व समृद्ध होण्यासाठी या उपक्रमात विविध क्षेत्रांतील संस्था, व्यक्तींनाही सहभागी करावे. लोकसहभागातून शाळा अधिक समृद्ध कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज गोपाळखेड येथे केले.
शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी आज गोपाळखेड येथील जि. प. केंद्रिय वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, विस्तार अधिकारी दीपमाला भटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीपजी देशमुख व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी उपस्थित होते.
शाळेने निर्माण केलेले वेदर स्टेशन, संगणक कक्ष, बाल वाचनालय, कार्यानुभव प्रदर्शन, शालेय पोषण आहार योजना, ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजना आदी विविध उपक्रमांची पाहणी व आढावा जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला. शाळेतील प्रत्येक वर्गाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचीही पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन उपक्रमासाठी गावात लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेश गोसावी यांनी उपक्रमाची माहिती सर्वांना दिली. याप्रसंगी वंदना मांगटे, मंगेश देशपांडे, श्याम देवकर, शीला साबळे धामणा शाळेचे मुख्याध्यापक विजय बोरसे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news