जिल्ह्यात 25 हजार घरांवर होणार ‘सुर्योदय’ योजनेतून ऊर्जानिर्मिती – जिल्हाधिकारी अजित कुंभार

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत अकोला जिल्ह्याचा समावेश

जिल्ह्यात 25 हजार घरांवर होणार ‘सुर्योदय’ योजनेतून ऊर्जानिर्मिती जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 31 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘सुर्योदय’ योजनेत राज्यातील सात जिल्ह्यांत अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील 25 हजार घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.   केंद्र शासनाकडून सौर पॅनेलसाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

देशात एक कोटी घराच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेली ‘सुर्योदय’  योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. योजनेत राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूरबरोबरच  अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात 25 हजार घराच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. या योजनेत ग्राहकांना केंद्र शासनाकडून 40 टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे 1 लाख 57 हजार खर्च येतो व त्यामध्ये सुमारे 54 हजार रू. पर्यंत अनुदान मिळते.

         सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीज देयकात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्याचा उपयोग पुढे दीर्घकाळासाठी होत राहतो. सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

इच्छूकांनी महावितरणच्या mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.       सुर्योदय योजनेत छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्याही बँकेकडून हप्त्यावर  कर्ज उपलब्ध होऊ शकते. सौर ऊर्जानिर्मितीने वीज देयकाच्या वाचणा-या पैश्यातून कर्जफेड शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतीने आर्थिक भुर्दंडाविना ही सुविधा वापरता येते.

घरगुती देयकात मोठी बचत, घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ, १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के अनुदान, ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान, सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या              ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळते. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेते. असे अनेक फायदे असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.

०००

बार्शीटाकळी तालुक्यातील दोन संस्था अंतरिम अवसायनात

अकोला, दि. 31 : सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात ठरविण्यात आल्या असून, तशी नोटीस जारी करण्यात आली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील बजरंग मजूर सहकारी संस्था, तसेच बार्शिटाकळी येथील पटवारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था या दोन संस्था अवसायनात काढण्याबाबत अंतरिम आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या संस्थांनी स्पष्टीकरण अथवा हरकती 30 दिवसांच्या आत लेखी किंवा बार्शीटाकळी येथील सहायक निबंधक कार्यालयात उपस्थित राहून सादर कराव्यात अन्यथा अंतिम आदेश काढण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधक ए. एस. शास्त्री यांनी दिला आहे.

०००

हेल्मेट वापर जागृती भित्तीपत्रकाचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन

अकोला, दि. 31 : वाहनांचे वाढते अपघात आणि त्यात होणारी हानी टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर ही काळाची गरज आहे, असे जिल्हाधिकारी तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अजित कुंभार यांनी सांगितले.

‘रेडक्रॉस’तर्फे हेल्मेट जागृतीबाबत तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. संस्थेचे मानद सचिव प्रभजीतसिंह बछेर, ॲड. सुभाषसिंह ठाकूर,  सनदी लेखापाल मनोज चांडक व इतर सदस्य उपस्थित होते.

हेल्मेट सक्तीसाठी व्यापक जागृती आवश्यक असून रेडक्रॉस सोसायटीने यासाठी पुढाकार घेऊन चांगले कार्य केले आहे, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

हेल्मेटची ‘एचईएलएमईटी’ ही अक्षरे सार्थ आहेत. त्यानुसार हेड, आईज, लिप्स, माऊथ, इयर्स, टीथ या सर्व अवयवांना सुरक्षितता मिळते, हेल्मेटच्या वापराबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचाही आग्रह असून, त्यांच्या भूमिकेला विविध संस्था आणि जागरूक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. बछेर यांनी यावेळी केले.

०००

जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ

–         डॉ. दिलीप रणमले

अकोला, दि. 31 : जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली असून, दि. 13 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आरोग्य सहायक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

कुष्ठरूग्णांकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. नियमित उपचार घेणा-या रुग्णांपासून इतरांना मुळीच अपाय नाही हे माहित असूनही सुशिक्षीत व्यक्तीही त्यांना टाळतात. ही हीनतेची भावना नष्ट व्हावी आणि हा रोग औषधोपचाराने विकृती न येता पूर्णपणे बरा होतो हा संदेश जनमानसावर ठसवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानात घरोघरी सर्वेक्षण करुन नविन कुष्ठरूग्णांचा शोध घेतला जाईल, जुन्या रूग्णांना भेटून नियमित उपचार घेतल्याची खातरजमा करणे, विकृती प्रतिबंधक सल्ला व सेवा देणे आदी कामे केली जातील. त्याचप्रमाणे, कुष्ठरूग्णांना शासनाच्या एस.टी. व रेल्वे मोफत प्रवास योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना आदी योजनांची माहिती दिली जाईल, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

 गांधीजींच्या कार्यातून अभियानाची प्रेरणा

कुष्ठरोगी रुग्णाला समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्याचा सर्वप्रथम प्रयत्न महात्मा गांधीनी केला. कुष्ठरोगी रुग्णांना समाजात हीन दर्जाची वागणुक दिली जात होती. या आजाराला धार्मिकतेशी जोडून हे पुर्व जन्मीचे पाप आहे असे सांगून रोगींना घराबाहेर काढले जात होते. त्यांच्यावर उपचार केले जात नव्हते व सामाजिक तिरस्कारांचा सामना करावा लागत होता. मिठाच्या सत्याग्रहामुळे सन 1932 मध्ये महात्मा गांधी हे येरवड्याच्या कारागृहात असताना परचुरे शास्त्री हेही तिथे होते. परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोग असल्यामुळे त्यांना सर्वापासुन वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गांधीजींनी भेटीची वारंवार विनंती करुनही त्यांना भेटू  दिले गेले नाही. कुष्ठरूग्णांची अवस्था पाहून गांधीजींनी त्यांची सेवा करण्याचा निश्चय केला. त्यांनी परचुरे शास्त्रींना वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात बंदीवास संपल्यानंतर आणले व ते जिवंत असेपर्यंत सलग तीन वर्षे सेवा केली.  कुष्ठरूग्णांबाबत समाजात असलेली हीन भावना दुर करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला, परचुरे शास्त्रींच्या निधनानंतर महात्मा गांधींनी आपल्या अठरासूत्री कार्यक्रमात कुष्ठरोग निर्मूलन हा विषय समाविष्ट केला. या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्पर्श अभियान राबविण्यात येत आहे, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news