पतीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची पत्नीची मागणी
माजी आ.स्व डॉ जगन्नाथ ढोणे यांच्या पत्नी प्रा डॉ आशालता ढोणे यांचा आरोप
अकोला– पातुर येथील प्रियदर्शनी आदिवासी उत्कर्ष फाउंडेशन, नवेगाव द्वारा संचलित डॉ वंदनाताई जगन्नाथ ढोणे बीएएमएस महाविद्यालय पातुर च्या संदर्भात आपले पती माजी आम. डॉ. जगन्नाथ ढोणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिवंगत माजी आम.डॉ जगन्नाथ ढोणे यांच्या स्थानिक जठारपेठ परिसरातील रहिवासी पत्नी प्रा.डॉ श्रीमती आशालाता जगन्नाथ ढोणे उर्फ आशालता रमण यांनी केली. मंगळवारी सेंटर प्लाझा सभागृहात या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा.डॉ. श्रीमती ढोणे यांनी या प्रकाराची माहिती दिली. डॉ.जगन्नाथ ढोणे यांचा 27 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांच्या गीता नगर येथील राहत्या घरी मृत्यू झाला होता.डॉ.ढोणे हे आपल्या वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या संदर्भात मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेले होते. मात्र तेथून परतल्यानंतर ते त्याच दिनी भयंकर तणावात चिडचिडे दिसून आले.
वारंवार फोनवर ते कुणाला काहीतरी रागात ,मी काही ट्रान्सफर केले नाही, मी काही सह्या केल्या नाहीत, माझ्यासोबत घात झाला,असे कुणाला तरी सारखे सांगत असतांना आपणास दिसले.यामुळे आपणही घाबरून गेलो होतो. या संदर्भात आपण त्यांना विचारले असता आपल्या सोबत मोठा दगा फटका झाला असल्याचे सांगून मी कुठेही सही न करण्याची ताकीत आपणास दिली होती.या नंतर त्यांचा ड्रायव्हरने त्यांना दुसऱ्या दिवशी कुठेतरी नेले होते. नंतर ते संध्याकाळी चार तासाने घरी आल्यावर पुन्हा तणावात बेचैन व अस्वस्थ घामाघूम दिसले. त्यांनी जेवणही केले नाही. त्यांना सारख्या उलट्या होत होत्या.ते तसेच झोपले.आपण काहीतरी त्यांनी खावे यासाठी खूप प्रयत्न केला पण त्यांनी काहीच खाल्ले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उठवले असता ते मृतावस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना आयकॉन येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले असल्याचे आपणास सांगण्यात आले.त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले नाही. हा चटकन झालेला सर्व प्रकार संशयास्पद आहे.
ड्रायव्हरने परत घरी आणल्यावर त्यांना ओकाऱ्या होऊन कोणताही औषध वा उपचार न करता आणि त्यांना काय झाले याचे निदान न होता त्यांचा मृत्यू होणे हा ही प्रकार संशयास्पद आहे.म्हणून अशा घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करावी व यातील खरे तथ्य उजेडात आणावे अशी मागणी प्रा.डॉ. आशालता ढोणे यांनी केली.डॉ ढोणे यांच्या पातूरच्या संस्थेचे बीएएमएस महाविद्यालय बळकावण्याच्या संदर्भात या तणावात त्यांचा नियोजन पूर्वक घात करण्यात येऊन त्यातच त्यांचा मृत्यू पद्धतशीरित्या करून आणण्यात आला असल्याचा आरोप प्रा डॉ श्रीमती ढोणे यांनी यावेळी केला.100 कोटी रुपयांच्या मूल्याची स्थावर जंगम मालमत्ता असणाऱ्या प्रस्तुत संस्थेच्या आपण सचिव असून प्रस्तुत संस्था बळकावण्यासाठी काही महाभाग कटकारस्थान करीत आहेत. या संदर्भात काही महाभागानी संगणमत करून खोटे दस्तावेज व खोट्या सह्या करून संस्था बळकावण्याचा प्रयत्न ही सुरू केला असल्याचा आरोप श्रीमती ढोणे यांनी यावेळी केला.यासंदर्भात संस्थेपासून वेगळे होण्यासाठी आपणास 8 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्नही झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र आपल्या पतीचे हे वैभवशाली संस्थेचे स्वप्न उरी बाळगून आपण या संस्थेचे हित त्यांची पत्नी म्हणून बघत आहोत. साहेबांच्या मृत्यूनंतर आपणासही मानसिक त्रास देण्याचा हेतूपुरस्पर प्रयत्न करण्यात आला. आपले चरित्रहनन ही करण्यात आले.म्हणून आपण साहेबांचे घर सोडून आपली आठ वर्षीय मुलगी आराध्या जगन्नाथ ढोणे हिच्यासोबत जठारपेठ येथे राहत असल्याचे श्रीमती प्रा डॉ ढोणे यांनी यावेळी सांगितले. डॉ. ढोणे निवर्तल्या नंतर त्यांच्या संस्थेची स्थावर जंगम मालमत्ता बळकावण्यासाठी मोठ मोठे पुढारी प्रयत्नात असून अशा स्वार्थी महाभागांची सीबीआय मार्फत चौकशी करून आपणास न्याय द्यावा अशी मागणी प्रा डॉ श्रीमती आशालता ढोणे यांनी या पत्रकार परिषदेत केली.यावेळी महेंद्र ढोणे आदी उपस्थित होते.