केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह ५ मार्च रोजी अकोला जिल्ह्यात!
अकोला केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह ५ मार्च रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भासह वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्च रोजी अकोला येथे येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. ते अकोला येथे पश्चिम विदर्भातील अकोल्यासह अमरावती, बुलढाणा, यवतमाळ- वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बी. संतोष हे उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांने दिली. पाचही लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सोबत ते बैठक घेणार असून, लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी सुद्धा या बैठकीत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.