लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून आढावा

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून आढावा

मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण पूर्ण

अकोला, दि. 17 : अकोला लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नोडल अधिका-यांच्या, तसेच कर्मचा-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना प्रक्रियेची माहिती दिली.

 

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चाची मर्यादा, मतदान प्रक्रिया आदी विविध बाबींची माहिती जिल्हाधिका-यांनी पक्ष प्रतिनिधींना दिली. शासकीय यंत्रणेच्या जबाबदा-या व करावयाची कार्यवाही याबाबत सर्व यंत्रणा अधिका-यांना व कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्या. आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून, योजना- कामांचे फलक झाकण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण व्हावी. निवडणूकीच्या अनुषंगाने सजग राहावे. अनावश्यक रजा टाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

*मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण*

निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त मनुष्यबळाच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुंभार यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीमती वाजपेयी आदी उपस्थित होते. मतदान यंत्रांचे प्रथम सरमिसळीकरण दि. 19 मार्चला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात येणार आहे.

शस्त्र वापरावर निर्बंध

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. कुंभार यांनी शनिवारी (16 मार्च) जारी केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news