मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर ‘राम’ नामाचा उल्लेख
अकोला प्रती – अकोला : येथील श्री. राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी खोदकाम चालू असताना जमिनीखाली इमारत आढळून आलीय. गेल्या काही दिवसांपासून श्री. राजराजेश्वर मंदिराचे काम सुरू आहे. मंदिराच्या आजुबाजूच्या परिसराचा विकास केला जातोय. त्यावेळी खोदकाम करत असताना जमिनीखाली भुयारीसारखी दिसणारी एक इमारत आढळून आली. ही इमारत २०० वर्षापेक्षा जास्त वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं आहे.
अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या
विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू होतं दोनशे ते अडीचशे वर्ष जुने भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान ज्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे, हा परिसर पूर्ण असदगड किल्ला भागातला आहे. खोदकाम
सुरू असलेल्या जागेपासून अगदी काही अंतरावर असदगड किल्ला आहे. या भुयाराच्या आतमध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खूप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेले सुद्धा आढळून आले, या भुयाराच्या आतमध्ये २ छोट्या खोल्या बनल्या असून या भुयारात अंधार झाल्यानंतर कंदील लावण्यासाठी सोय करण्यात आलीय. नेमके हे भुयार सारखे दिसणारी इमारत कशासाठी तयार करण्यात आली असावी याचा अंदाज सध्या लावता येणे शक्य नाही. पण या जमिनीखाली इमारत आढळून आल्याने त्याचं कुतूहल होत आहे.