लग्न समारंभ आटपून घरी जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घात..!
मुर्तीजापुर -कारंजा राज्य महामार्गावर घडला भीषण अपघात.
अपघातात एक चिमुकली व महिला जागीच ठार.
प्रतिनिधी मुर्तीजापुर शाम वाळस्कर :- भरदाव वेगाने कार ने ऑटो ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक चिमुकली सह महिला जागीच ठार झाली तर ऑटो मधील ३ प्रवाशी अती गंभीर जखमी झाले, ही घटना गुरवार सायंकाळी ६ ते ६.३० वाजता च्या सुमारास मूर्तिजापूर -कारंजा राज्य महामार्गावरील तुरखेड फाट्या नजीक घडली.
मुर्तीजापुर वरून कारंजाच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत भडशिवणी वरून लग्न समारंभ आटपून ऑटो ने आपल्या घरी जात असलेल्या वऱ्हाडास तुरखेड फाट्या नजीक समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. अपघात एव्हडा भयानक होता की, ऑटो चा चेंदामेंदा च झाला. या अपघातात उज्वला विश्राम जाधव रा. जितापूर नाकट ५५ वर्ष तर दिया अजय पवार रा. पारधी वाडा कानडी या ७ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर ऑटो मधील दिनानाथ रामराव पवार रा. गणेशपूर ९ वर्ष, विश्राम शिवराम जाधव रा. जितापूर नाकट ६० वर्ष व अमर सुरेश फुलझले रा. खेर्डा ७५ वर्ष हे प्रवाशी अती गंभीर जखमी झाले. सदर अपघातातील कार चालक ग्रामसेवक असून त्याने मद्यधुंद अवस्थेत ऑटो ला धडक दिल्याचे सांगितल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, अमोल खंडारे व बादशाह यांनी जखमींना तातडीने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले परंतु जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तर मृतकांच्या व जखमींच्या नातेवाईकांकडून कार चालकावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. घटनेचा पुढील तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहेत.