अकोला हादरला पुन्हा एक हत्या!

अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगर येथे मंगळवारी रात्री दोन मालवाहक चालकांमध्ये वाद होउन झालेल्या हाणामारीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एका पाठोपाठ हत्येच्या घटनेमुळे शहर हादरले आहे.

एमआयडीसी परिसरात ट्रान्सपोर्ट नगर हे ठिकाण विविध ट्रक व माल वाहक चालकांसाठी रात्रीच्या थांब्याचे मुख्य केंद्र आहे. येथे अनेक ट्रक तसेच माल वाहक चालक आपले वाहन उभे करतात आणि सकाळी फॅक्टरीत माल उतरवतात. अशाच प्रकारे मंगळवारी रात्री काही ट्रक चालक ट्रान्सपोर्ट नगर येथे पोहोचले होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळ येथील विलास पंजाबराव इंगळे (वय ४०) व याच गावातील रहिवासी शुभम गिऱ्हे वय २४ वर्ष व गजानन गिऱ्हे वय ५० वर्ष हे बाप लेक देखील आपली गाडी घेवून येथे थांबले होते. या दरम्यान विलास इंगळे यांचा शुभम गीऱ्हे (वय २४) आणि गजानन गीऱ्हे (वय ५०) या दोघांसोबत वाद झाला. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाद विकोपाला जाऊन त्याचे रूप हाणामारीत बदलले. या हाणामारीत विलास इंगळे यांना गंभीर दुखापत झाली.
हाणामारीनंतर विलास इंगळे यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटना घडल्यानंतर आरोपी शुभम गीऱ्हे आणि गजानन गीऱ्हे हे त्यांच्या ट्रक सह घटनास्थळावरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांना माहिती दिली. अकोला जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूर्तिजापूर येथील एका ढाब्यावरून आरोपींना आणि त्यांच्या ट्रकला ताब्यात घेतले.
मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले असून मृत्यू हाणामारीमुळे झाला की हृदयविकाराच्या झटक्याने, याचा खुलासा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर होईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news