विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

 अकोला  दि.१७- अमरावती विभागीय आयुक्त  डॉ. निधी पाण्डेय यांनी आज अकोला येथे विविध विषयांचा आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,  अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मनपा व जिल्हा मुख्यालयातील अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

मनपा, नगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधा विकास अंतर्गत करावयाच्या विकासकामांबाबत त्यांनी आढावा घेतला. त्यात महापालिकेच्या यंत्रणेमार्फत करावयाची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची कामे अशा दोन यंत्रणांमार्फत माहिती सादर करण्यात आली. याबाबत त्यांनी आढावा घेतला. तसेच आर्थिक वर्ष समाप्तीच्या अनुषंगाने महसूल, जिल्हा नियोजन समितीचा निधी, घरकुल निधी इ. बाबत आढावा त्यांनी घेतला. कर्मचारी संपाच्या पार्श्वभुमिवर अत्यावश्यक सेवांबाबत खबरदारी घ्यावी,अशा सुचनाही त्यांनी केल्या.

०००००

‘चला जाणू या नदीला’अभियान

तालुकास्तरावर नदी विकास आराखडा तयार करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 अकोला  दि.१७- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणू या नदीला’ या अभियाना अंतर्गत नदी संवाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्या त्या नदी क्षेत्रात करावयाच्या विविध उपाययोजनांची कामे करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी,सरपंच व नदी संवाद यात्री यांनी संयुक्त बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

‘चला जाणू या नदीला’, या अभियानाचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे तसेच नदी संवाद यात्री  प्रमोद सरदार व अरविंद नळकांडे तसेच नदी यात्री  तुषार हांडे तसेच नदी परिक्रमा झालेल्या गावचे सरपंच आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील पिंजरडा या नदीची उगम ते संगम ही नदी संवाद यात्रा पूर्ण करण्यात आली. तर अमरावती जिल्ह्यातून येणारी चंद्रभागा नदीच्या अकोला जिल्हा हद्दीतील एका गावातही यात्रा झाली आहे. नदीच्या या  परिक्रमेत  नदीच्या अस्वच्छतेची कारणे, तेथे झालेले अतिक्रमणे,  मातीचे क्षरण, प्रदुषण इ. बाबत माहिती संकलन करण्यात आले असून या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांच्या सहयोगातून ही कामे करावयाची आहेत. त्यासाठी नदी खोऱ्यांचे नकाशे, पाणलोट क्षेत्र नकाशे, पर्जन्यनोंदी, अतिवृष्टी,  अतिक्रमणे इ. माहिती घेऊन उपाययोजनांसाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी व गावचे सरपंच व ग्रामस्थांनी मिळून तालुकास्तरावर बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.

०००००

 कोविडःचार पॉझिटीव्ह

 अकोला दि.१७ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ७४ अहवाल प्राप्त झाले. त्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. ४ व खाजगी ०)४+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह ४.

आरटीपीसीआर ‘चार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्या चारही महिला असून  अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘१७

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०९९(४९९६६+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news