अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांवर अवैध ऑटोचालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून, आज सकाळपासून गांधी चौक, नेहरू पार्क रोड, बसस्टँड चौक, रेल्वे स्टेशन मार्ग आणि टॉवर चौक परिसर पूर्णपणे ठप्प झाला.
रोजच्या प्रमाणे या अवैध ऑटोने रस्ता अडवून उभी पार्किंग, चुकीच्या दिशेने जाणे आणि प्रवासी मिळवण्यासाठी सिग्नलजवळ असलेली गर्दी—यामुळे शहराचा वाहतुकीचा र्हास शिगेला पोहोचला.
नागरिकांचा संताप : “पोलीस फक्त टू-व्हिलरवाल्यांना पकडतात, अवैध ऑटो मात्र मोकाट!”
नागरिकांनी संतापाने ताशेरे ओढत म्हटले:
“ट्रॅफिक पोलीस फक्त टू-व्हिलर आणि चारचाकींवर चालान करताना दिसतात. हेल्मेट, सीटबेल्ट यावर कारवाई होते… पण अवैध ऑटो रोज नियम तोडतात, तरी त्यांच्यावर कारवाई शून्य! मग कायदाच फक्त सामान्यांसाठी आहे का?”
रोज नियमभंग करणाऱ्या अवैध ऑटोची संख्या शहरात वाढत असून त्यावर कोणतीही कडक दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे.
नागरिक संतप्त : “ऑटो चालवायचे की रस्ता अडवायचा?”
विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच आपत्कालीन सेवांनाही वाहतूककोंडीचा गंभीर फटका बसला. अनेक वाहनचालकांना १५ मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागला.
नागरिकांनी रोष व्यक्त करत विचारले,
“अवैध ऑटो रोज नियम तोडतात… मग ट्रॅफिक पोलीस आहेत तरी कुठे?”
सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावालाच?
शहरात बसवलेले शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असताना रोजचे नियमभंग थेट कॅमेऱ्यावर दिसत आहेत. मात्र त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“कॅमेऱ्यात सर्व दिसते, पण कारवाई नाही! मग हे कॅमेरे फक्त शोभेचेच का?” असा प्रश्न नागरिकांनी उचलला.
ट्रॅफिक पोलीसांची गायब भूमिका
गर्दीच्या महत्त्वाच्या वेळेतही ट्रॅफिक पोलीस फारसे दिसले नाहीत. मुख्य रस्त्यांवरील वाहनांच्या रांगांनी नागरीक त्रस्त झाले असताना पोलिसांची उपस्थिती शून्य असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अवैध ऑटोवर दररोज तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.
कारवाईचे काय?
ट्रॅफिक विभागाने अवैध ऑटो, अनियमित पार्किंग, तथा नियम मोडणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई केली नाही तर अकोल्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजचा प्रभावी वापर, डिजिटल चालान, आणि अवैध ऑटोवर संयुक्त मोहीम राबवली तरच परिस्थिती नियंत्रित होऊ शकते.



पोलिसच हप्ते घेऊन अवैध धंद्यांना चालू देत आहेत ट्रॅफिक सिग्नल फक्त नावालाच आहे कोणी ही ट्रॅफिक नियम मोडून वाहन काढून मध्येच निघून जातो मात्र ट्रॅफिक पोलिस कुठेच दिसत नाहीत