महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून, या योजनेच्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-केवायसी करण्यास सांगितले होते. 18 सप्टेंबर पासून ईकेवायसीची प्रक्रिया सुरू झाली होती. ईकेवायसी करम्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. ईकेवायसीची मुदत संपली आहे. पण ज्या महिलांनी ईकेवायसी केली नाही त्यांचं काय होणार?
राज्यात अजूनही अनेक महिलांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असा अंदाज आहे. वारंवार सूचना देऊनही तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. नियमानुसार, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांना ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे.
नवीन वर्षात लाभ मिळणार की नाही?
सरकारने स्पष्ट केले आहे की, केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी केली आहे आणि त्या नियमात, निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी ईकेवायसी केले नाही त्यांची नावे योजनेतून वगळण्याची शक्यता आहे.
खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ही मोठी भेट दिली असून, अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज धडाधड आले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 3000 रुपये येतील अशी अपेक्षा सर्वांना होती. पण लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाले आहेत.

