नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत सकाळी 7 वाजताच सुमारास मोठा स्फोट झालाय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
स्फोटनंतर परिसरात आग, नागरिकांमध्ये मोठा रोष
दरम्यान, या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडालीय. तर या भीषण स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक विभगाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दुसरीकडे परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये मोठा रोष उसळल्याचेही चित्र आता बघायला मिळत आहे. SBL कंपनीत सकाळी 7 वाजताच सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कंपनीकडून सुरक्षितते बद्दल मोठं दुर्लक्ष,आमदार चरणसिंग ठाकूरांचा आरोप
दरम्यान, या स्फोटाच्या अपघातावर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी 15 मृत्यू आणि 20 जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षितते बद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रशिक्षणा शिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.

