अकोटमध्ये थरार! जुन्या वादातून तरुणाची हत्या; २४ तासांत ६ जण जेरबंद
अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सर्व आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी
अकोट (प्रतिनिधी):
राजेंद्रनगर, खानापूर वेस भागात जुन्या आपसी वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपीसह ६ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींची १० मार्च रोजी ६ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
लोखंडी पाईप व चाकूने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर येथील रहिवासी लखन अंभोरे यांच्यावर ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी राम पांडुरंग अंभोरे व त्याच्या इतर साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केला. यावेळी आरोपींनी लोखंडी पाईप, चाकू, दगड आणि विटांचा वापर करून लखन यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी दुर्गा लखन अंभोरे (३२) यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या लखन अंभोरे यांना तातडीने अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने १० मार्च रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांचा तत्पर तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील आणि ठाणेदार अमोल माळवे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने (DB Team) तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत ६ आरोपींना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी बजावणारे पथक:
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल माळवे, सपोनि शमुवेल वानखडे, डी.बी. पथक प्रमुख पो.उप.नि. निलेश बारहाते, अविनाश मोहिते, समाधान मिसाळ व त्यांच्या पथकाने केली. यामध्ये नरेंद्र जाधव, गणेश सोळंके, गजानन राठोड, विपुल सोळंके, कपिल राठोड, सुबोध खंडारे, नितेश सोळंके आणि मोहन दुर्गे यांचा समावेश होता.

