काकाची हत्या करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव; पुतण्या व वहिनी पोलिसांच्या जाळ्यात
——————–
प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर
तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. काकाच्या मृत्यूला नैसर्गिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.गळा आवळून हत्या केल्यानंतर मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक निष्कर्ष आणि पोलिसांच्या तपासातील तल्लखता यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पुतण्या आणि वहिनीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, नातेसंबंधातील तणाव किती भयावह वळण घेऊ शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात घडलेल्या हत्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेमागे थरारक सत्य दडलेले असल्याचे तपासात उघड झाले आहे. फिर्यादी गोपाल भटकर यांना त्यांच्या पुतण्याने फोन करून काका संजय भटकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत तपास सुरू केला.मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण “गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू” असे नमूद करण्यात आले.यानंतर हे प्रकरण नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की,घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली आहे.तपासादरम्यान पोलिसांनी संजय भटकर यांचा पुतण्या स्वप्नील भटकर आणि वहिनी संगीता भटकर यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी मिळून गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. ही घटना घरगुती वादातून घडल्याचे समोर आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे,पो.नि.शंकर शेळके,स्थानिक गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन,पो.हे.कॉ.संदिप सरोदे पो. कॉ. जावेद खान,मंगेश पवार, जयश्री मेंढे यांनी पुढील कारवाई केली.

