अकोला: शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मारहाणीच्या आणि गुंडगिरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, खाकी वर्दीचा कोणताही वचक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. रविवारी (दि. ७ जून) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जवाहर नगर ते शासकीय दूध डेअरी रस्त्यालगत असलेल्या धर्मवीर राजे संभाजी पार्कजवळ दोन व्यक्तींना अज्ञात टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. या गंभीर घटनेत रक्ताळलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाला सिव्हिल लाईन पोलिसांनी तब्बल एक तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. एवढेच नव्हे तर, या अमानवीय घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी अत्यंत उद्धट वागणूक दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवरच संशय निर्माण झाला आहे.
**नेमकी घटना काय?**
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत देशमुख हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मित्राच्या ट्युशन क्लाससमोर उभे होते. यावेळी धर्मवीर राजे संभाजी पार्कमध्ये काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळत असताना क्रिकेटचा बॉल दिनेश सूर्यवंशी यांच्या पाठीला जोरात लागला. त्यांनी तो बॉल परत देण्यास नकार दिला असता, या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या टवाळखोर तरुणांनी दिनेश सूर्यवंशी आणि अभिजीत देशमुख यांच्यावर थेट हल्ला चढवला. या बेदम मारहाणीत अभिजीत देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करणारे हे तरुण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, सिव्हिल लाईन पोलीस केवळ तपास करत असल्याचा देखावा करत आहेत.
**सिव्हिल लाईन पोलिसांचा भोंगळ कारभार**
* **जखमीला वेठीस धरले:** गंभीर जखमी असलेल्या तरुणाला त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, पोलिसांनी त्याला चक्क एक तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवले.
* **पत्रकारांचा अपमान:** पोलिसांच्या या असंवेदनशील कार्यप्रणालीबाबत सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत पोलिसांनी अरेरावी करत उद्धट वर्तन केले. चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा हा हुकूमशाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
**नावालाच पोलीस चौकी; वापर नेमका कुणासाठी?**
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे जवाहर नगर चौकात नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे, मात्र ती केवळ एक ‘शोभेची वास्तू’ बनून राहिली आहे. या चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नसतो. उलट, बाहेरील अनोळखी व्यक्ती, टवाळखोर आणि फेरीवाले या चौकीचा राजरोसपणे वापर करताना दिसतात. हे लोक तिथे बिनधास्त येऊन बसतात आणि चक्क आपले मोबाईल चार्जिंगला लावतात. **मग प्रश्न असा पडतो की, ही पोलीस चौकी नेमकी कशासाठी आणि कुणासाठी आहे? पोलिसांसाठी, बाहेरील व्यक्तींसाठी की फेरीवाल्यांसाठी?** लाखोंचा निधी खर्चून उभारलेल्या या चौकीचा असा गैरवापर होत असताना सिव्हिल लाईन पोलीस नेमके डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत का?
**धर्मवीर राजे संभाजी पार्क बनले टवाळखोरांचा अड्डा**
सदर परिसरात नेहमीच मारहाणीच्या आणि दादागिरीच्या घटना घडत आहेत. धर्मवीर राजे संभाजी पार्कमध्ये दिवसभर गुंड प्रवृत्तीच्या मुलांचा वावर असतो. यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षित चालणेही कठीण झाले आहे. यापूर्वी स्थानिक नागरिकांनी या टवाळखोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना वारंवार निवेदने दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज या समाजकंटकांची हिंमत वाढली असून परिसरात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे.
**पोलीस अधीक्षक साहेब, लक्ष देणार की आणखी एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहणार?**
सिव्हिल लाईन हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलीसच जर बघ्याची भूमिका घेत असतील, चौकीचा वापर फेरीवाले करत असतील आणि जाब विचारणाऱ्यांचा अपमान होत असेल, तर नागरिकांनी न्याय मागायला कुणाकडे जायचे? या गंभीर प्रकरणाची दखल घेत अकोल्याचे पोलीस अधीक्षक या बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि जवाहर नगर परिसरातील दादागिरी करणाऱ्या गुंडांवर तातडीने कठोर कारवाईचा बडगा उगारणार का? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

