अकोला जिल्ह्यातील अकोट येथे निवडणुकीच्या तोंडावर दोन गट आमनेसामने आल्याने मोठा राडा झाल्याची घटना घडली. ही घटना अकोट शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे आणि तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, अकोट शहरात सुरू असलेल्या मतदानाच्यादरम्यान दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन राड्यात परिवर्तित झाला. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटांना वेगळे करत परिस्थिती नियंत्रणात आणली. एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी चोप देत ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अकोट पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिसरात गस्त वाढवली आहे. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे अकोट शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

