सिव्हिल लाईन हद्दीत मित्रानेच केली मित्राची हत्या? जवाहर नगर परिसरात खळबळ; लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने सिव्हिल लाईनचा कारभार?
अकोला : सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहर नगर परिसरात एका इसमाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या घटनेत मित्रानेच मित्राची हत्या केल्याची चर्चा आहे. मृतकाचे नाव नितीन वानखडे (रा. शास्त्रीनगर) असून, हत्येचा आरोप असलेली व्यक्ती रणपिसे नगर येथील राहुल आकतकर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात नेमके काय घडले आणि हत्येमागचे नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अंतिम सत्य पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होईल.
सिव्हिल लाईन गुन्हेगारीचे माहेरघर बनले का? सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. हे पोलीस स्टेशन गुन्हेगारीचे माहेरघर बनले आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, या पोलीस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
अवैध दारू, जुगार आणि चाकू हल्ल्यांचे प्रमाण वाढले का?
सिव्हिल लाईन हद्दीत अवैध दारू, जुगार आणि चाकू हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकाऱ्याचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नसल्यामुळेच अशा घटना वाढल्या आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, सायंकाळनंतर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
ज्यूस सेंटर आणि अवैध धंद्यांबाबत
जवाहर नगर परिसरात रात्री उशिरापर्यंत ज्यूस सेंटर सुरू; पोलिसांच्या ‘मेहरबानी’मुळे गावगुंडांचा सुळसुळाट जवाहर नगर ते शासकीय दूध डेरी रस्त्यावरील एका ज्यूस सेंटरवर पोलिसांची विशेष ‘मेहरबानी’ असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नियमांना धाब्यावर बसवून हे ज्यूस सेंटर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गावगुंड आणि टवाळखोरांचा जमावडा होत असल्याने परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांना आणि महिलांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे. पोलिस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालवले की काय, असा सवाल आता त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांचा दुजाभाव भोवला; माननीय न्यायालयाने सुनावले खडे बोल!
एका रुग्ण महिलेने डॉक्टरविरोधात एक महिना अगोदर तक्रार देऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही. मात्र, धक्कादायक म्हणजे त्याच प्रकरणात डॉक्टरची तक्रार तब्बल सात दिवसांनंतर स्वीकारून पोलिसांनी उलट त्या पीडित महिलेवरच गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या या एकतर्फी आणि संशयास्पद कारवाईची माननीय न्यायालयाने गंभीर दखल घेत संबंधित पोलीस स्टेशनला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाच्या या फटकारामुळे संबंधित पोलीस स्टेशनच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खोट्या गुन्ह्यांत सामान्य नागरिकांना अडकवले जात आहे का?
संबंधित पोलीस स्टेशनमधील अधिकारी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सामान्य नागरिकांनाच खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्रास देत असल्याची गंभीर चर्चा शहरात सुरू आहे. रक्षकांकडूनच असा त्रास होत असल्यास सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने बदली रखडली का? एका लोकप्रतिनिधीच्या राजकीय आशीर्वादामुळेच संबंधित अधिकाऱ्याची बदली होत नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. हा लोकप्रतिनिधी नेमका कोण, याचा शोध जिल्हा पोलीस अधीक्षक घेतील का? राजकीय दबावामुळेच येथील अवैध धंद्यांवर कारवाई होत नाही का? जनतेच्या सुरक्षेपेक्षा राजकीय आशीर्वाद मोठा झाला आहे का? असे अनेक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून अपेक्षा
जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांचा मोठा विश्वास आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक अवैध धंद्यांवर धडक कारवाई करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. त्यांच्या कठोर आणि निष्पक्ष भूमिकेमुळेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळेच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याची इतरत्र बदली करून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांची मागणी काय? सिव्हिल लाईन हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. येथील अवैध धंदे बंद होणार का? गुन्हेगारांवर पुन्हा वचक निर्माण होणार का? आणि राजकीय आशीर्वादाचे सत्य समोर येणार का? याकडे आता संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलीस दल अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

