लोखंडी पुलाखालून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनजवळील लोखंडी पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज काही नागरिकांना पुलाखाली संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला, त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पंचनामा व पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.
