एकीकडे देशात आणि राज्यात राज्यकर्त्यांकडून विकसित भारत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं दाखवली जात असतानाच स्वातंत्र्यापासूनच उपेक्षित राहिलेल्या विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur news) जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतकऱ्यांची (Farmers) होरपळ किती विदारक असू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एका सावकाराने (Moneylender) आपले कर्जाचे पैसे वसूल (Loan repayment) करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरश: स्वत:ला विकायला लावले आहे.
कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी (Kidney) विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय (Milk business) सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला.
8 लाखाला विकली किडनी
एक लाखाचे 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
हा महाभयानक प्रकार
हा महाभयानक प्रकार आहे एक लाखाचे 74 लाख कसे झाले, असे अनधिकृत सावकार सावकारी करत असेल तर त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, आम्ही शेतकऱ्यांच्या कर्ज विषयी सरकारला बोलत राहतो. पण सरकार कानावर घेत नाही. सरकार करत आहे. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागते यासारखे दुर्दैव दुसरं कुठलं नाही. या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे हे मोठे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
सरकार किती काम करते हे दिसते
किडनी विक्री प्रकारावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त केल आहे. यावरुन दिसते सरकार किती काम करत आहे. त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

