मुंबई Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) दुपारी याबाबतची माहिती दिली. महानगरपालिका निवडणूक अवघ्या दोनच दिवसांवर असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात तारीख – 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
- उमेदवारी छाननी – 22 जानेवारी 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2026
- मतदान तारीख – 5 फेब्रुवारी 2026
- निकाल तारीख – 7 फेब्रुवारी 2026
न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुका जाहीर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडं डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांसाठी तयारीला लागण्याची संधी निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयानं सोमवारीच राज्य निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी न्यायालयानं ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव निवडणूक आयोगानं १० फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला होता. अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या आहेत.
कोणत्या १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार? – लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली.
25 हजार 482 मतदान केंद्र तयार – या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मतं देणे गरजेचे आहे. एक मत हे जिल्हा परिषद आणि एक मत हे पंचायत समितीसाठी देणं गरजेचं आहे. निवडणुकीसाठी 25 हजार 482 मतदान केंद्र तयार आहेत. या केंद्रावर सर्व सोयी उपलब्ध असणार आहेत. या निवडणुकीसाठी 1 जुले 2025 पूर्वीची मतदान यादी वापरली जाणार आहे.

