अकोल्यात खळबळ! जकात नाका परिसरातील कॅनॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
अकोला: शहरातील जुने शहर परिसरात एका खळबळजनक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जकात नाका परिसरातील कॅनॉल (नाल्यात) एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारच्या सुमारास स्थानिक नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
ओळख अद्याप अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, ही महिला आणि तिचा पती गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात राहत होते. मात्र, हे दाम्पत्य नेमके कुठून आले आणि त्यांची ओळख काय? याबाबत कोणालाही फारशी माहिती नाही. या महिलेचा मृत्यू अपघाती आहे की यामागे काही घातपात आहे, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक कोळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डाबकी रोड पोलीस स्टेशन करत आहे.
