अकोला मनपात उपअभियंत्याचा पुन्हा ‘प्रताप’; चार महिन्यांपासून रस्ता खोदून कंत्राटदाराचे लाड, नागरिक त्रस्त!
प्रभाग १३ मधील जवाहर नगर परिसरातील अवस्था; संबंधित ठेकेदार मनपाचा ‘जावई’ आहे का? नगरसेवक आशिष पवित्रकार यांचा संतप्त सवाल
अकोला (प्रतिनिधी):
अकोला महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र असून, उपअभियंता वाडेकर आणि त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील जवाहर नगर, आराम मशीन परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेले नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी “संबंधित ठेकेदार मनपाचा जावई आहे का?” असा खोचक सवाल करत आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
तांत्रिक ज्ञान नसतानाही ‘विकासकामांचा’ घाट?
महानगरपालिका वर्तुळात सध्या उपअभियंता वाडेकर यांच्या कार्यपद्धतीची मोठी चर्चा आहे. सक्षम तांत्रिक ज्ञान नसतानाही त्यांच्याकडे महत्त्वाच्या प्रभागांची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप होत आहे. प्रभाग १३ मध्ये त्यांनी यापूर्वी तयार केलेल्या रस्ते आणि नाल्यांना अवघ्या काही दिवसांतच तडे गेले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम होऊनही संबंधित कंत्राटदाराची बिले कशी काढली गेली? इंजिनिअर आणि उपअभियंत्यांनी कामाची पाहणी केली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
चार महिन्यांपासून रस्ता ‘जैसे थे’
जवाहर नगरमधील आराम मशीन परिसरातील रस्ता गेल्या चार महिन्यांपूर्वी खोदून ठेवण्यात आला. सिमेंट रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, खोदलेल्या रस्त्यामुळे धुळीचे लोट आणि अपघातांची भीती वाढली आहे. चार महिने उलटूनही प्रशासनाचे याकडे लक्ष का नाही? मनपाकडे या एकाच कंत्राटदाराशिवाय दुसरे कंत्राटदार नाहीत का? की या कंत्राटदारावर विशेष मेहेरबानी केली जात आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
अंदाजपत्रकाबाहेरील कामांचा सुळसुळाट
वाडेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रभाग ५, १२ आणि १३ मध्ये अनेक कामे अंदाजपत्रकीय तरतुदी व्यतिरिक्त (Out of Budget) घेतल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. मागील ६ ते ७ वर्षांपासून हा प्रकार नियमित सुरू असून, अनेक कामे दोष दायित्व कालावधी (DLP) पूर्ण होण्याआधीच खराब झाली आहेत. तरीही त्याच कंत्राटदारांना पुन्हा कामे देऊन प्रशासकीय तिजोरीची लूट सुरू असल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नगरसेवक आशिष पवित्रकार आक्रमक
या संदर्भात बोलताना नगरसेवक आशिष पवित्रकार म्हणाले की, “संबंधित उपअभियंता आणि कंत्राटदाराने संगनमताने गेल्या चार महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. तिथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कंत्राटदार मनपाचा जावई आहे का, जो नियमांना धाब्यावर बसवून काम करत आहे? मी याप्रकरणी आयुक्तांना पत्र दिले असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”
आता या प्रकरणावर मनपा आयुक्त काय भूमिका घेतात आणि त्या ‘लाडक्या’ कंत्राटदारावर कारवाई होते का, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.


