खाकी वर्दीला काळिमा! अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस निरीक्षक राजेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
अकोला (प्रतिनिधी): ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपी महिलेकडे “तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी पाठव, तुला १० हजार रुपये देतो,” अशी अत्यंत घृणास्पद मागणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव याने केली. या प्रकारामुळे पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित एएसआयला निलंबित केले आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पीडित महिलेला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्याने तिची रवानगी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत करण्यात आली होती. याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एएसआय राजेश जाधव याने आपल्या पदाचा गैरवापर करत महिलेला गाठले. त्याने केवळ पैशांचे आमिषच दाखवले नाही, तर तिच्या पोटच्या मुलीला शरीरसुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची निर्लज्ज मागणी केली.
वरिष्ठांचा रुद्रावतार: ‘वर्दीची तरी लाज राखायची होतीस…’
पीडित महिलेने या प्रकाराची माहिती धाडसाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी जाधव याला बोलावून त्याचा चांगलाच समाचार घेतला. “वर्दी घातली आहेस ना तू, हे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?” अशा कडक शब्दांत वरिष्ठांनी त्याला झापले. या घटनेची एक व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामध्ये संतप्त अधिकाऱ्यांनी त्याला मारण्यासाठी हात उगारला, मात्र वर्दीच्या सन्मानाखातर स्वतःला आवरल्याचे दिसून येत आहे.
तडकाफडकी निलंबन आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही गय न करता एएसआय राजेश जाधव याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राज्यात आधीच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे वातावरण तापलेले असताना, चक्क पोलीस ठाण्याच्या कोठडीतच अशा प्रकारची मागणी होणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. पोलिसांच्या संरक्षणात असलेली महिला जर सुरक्षित नसेल, तर दाद कोणाकडे मागायची? असा सवाल या निमित्ताने अकोलेकर उपस्थित करत आहेत.

