जिल्हाधिका-यांकडून शासकीय रूग्णालयाची पाहणी व आढावा

जिल्हाधिका-यांकडून शासकीय रूग्णालयाची पाहणी व आढावा

कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी तत्काळ प्रस्ताव द्यावा

–         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 9 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी नविन शासन निर्णयानुसार तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकतेच दिले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रूग्णालयाची पाहणी करून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रवीण सपकाळ यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, औषधनिर्माता आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, रूग्णालयात अतिआवश्यक औषध साठ्याच्या नियमित उपलब्धतेसाठी आवश्यकतेनुसार खरेदीच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी.  रूग्णालयात पुरेसा औषधसाठा व यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पुरेशा मनुष्यबळासाठी कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा. रूग्णसेवेत कुठेही उणीव राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात नियमित स्वच्छता ठेवावी.

आरोग्य यंत्रणेने कोरोनाकाळात अविरत सेवा बजावली आहे. यापुढेही सर्वांनी अशीच सकारात्मकता व संवेदनशीलता बाळगून कार्य करावे. सर्वांनी एक ‘टीम’ म्हणून समन्वयाने काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

बालरोगशास्त्र विभागाला कक्ष क्र. 32 ही जागा मिळण्याबाबत, तसेच औषधवैद्यकशास्त्र विभाग इतर कक्षात स्थलांतराबाबतही यावेळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेबाबत विविध विषयांची माहिती घेतली.

०००

 वृत्त 737

टपाल विभागातर्फे टपाल सप्ताहात विविध उपक्रम

दुर्मिळ तिकिटांचे बुधवारी प्रदर्शन

अकोला, दि. 9 : टपाल विभागातर्फे जागतिक टपाल दिनानिमित्त आजपासून टपाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत द अकोला फिलाटेलिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ तिकिटांचे प्रदर्शन अकोला येथील प्रधान डाकघर येथे दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजिण्यात आले आहे.

 दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागनिक टपाल दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा होतो. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. “टुगेदर फॉर ट्रस्ट” हे यंदाचे टपाल सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे. जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे जाळे भारतात आहे. कोरोना महामारीच्या काळात टपाल विभागाने औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वितरण केले.

          अकोला डाक विभागाद्वारे आजपासून 13 ऑक्टोबरपर्यंत टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी जागतिक टपाल दिवस, मंगळवारी (10 ऑक्टोबर) वित्तीय सशक्तीकरण दिवस, दि. 11 ऑक्टोबरला फिलाटली डे, दि. 12 ऑक्टोबरला मेल आणि पार्सल डे व दि. 13 ऑक्टोबरला अंत्योदय दिवस साजरा करण्यात येणार आहे. ,

सप्ताहादरम्यान डाक विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रवर अधिक्षक डाकघर भोजराज वामनराव चव्हाण यांनी सांगितले.

०००

वृत्त 738

महिला आयोग आपल्या दारी गुरूवारी अकोला जिल्ह्यात

महिलांनी पुढाकार घेत तक्रारी मांडाव्यात

– रुपाली चाकणकर यांचे आवाहन

अकोला, दि. 9 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’  उपक्रमात अकोला जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरूवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी नियोजनभवनात सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या उपस्थित राहतील. जिल्ह्यातील महिलाभगिनींनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले आहे.

महिलाभगिनींच्या तक्रारीचे जिल्ह्याच्या ठिकाणीच निराकरण व्हावे यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी जन सुनावणी व महिला आणि बालकांच्या विविध विषयांसंदर्भात अकोला जिल्ह्याची आढावा बैठक होईल.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेसोबत उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी यावेळी उपस्थित राहणार असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. या उपक्रमातून कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे, असे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

०००

निवडणूकांच्या अनुषंगाने जात पडताळणी प्रस्तावांबाबत समितीला सूचना

अकोला, दि. 9 : जिल्ह्यातील डिसेंबरअखेरपर्यंत मुदत संपणा-या 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व विविध कारणांनी रिक्त पदांसाठी 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होणार आहेत. त्या अनुषंगाने आरक्षित जागांवर निवडणूकांसाठी इच्छूक उमेदवारांकडून पडताळणीचे अर्ज स्वीकारून जात वैधता प्रमाणपत्राची कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला केली आहे.

निवडणुकीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अर्ज केल्याचा कोणताही पुरावा, तसेच निवडून आल्यापासून 12 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र घेतले जाते. इच्छूक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र, पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या मुदतीपर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत स्वीकारून अर्ज तहसीलदार तथा निवडणूक अधिका-यांनी तत्काळ जात पडताळणी समितीकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news