जिल्ह्यात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा

जिल्ह्यात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला, दि. १६ : नियोजित कामांना वेग देण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्पर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विकासकामांची गरज व पुढील काळात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करावे, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागप्रमुखांची सभा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. पोलीस अधिक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक विभागाने आवश्यक विकासकामे व विकासप्रक्रियेला दिशा देण्यासाठी येत्या काळात अपेक्षित बदलांचा वेध घेऊन सादरीकरण तयार करावे. पुढील वेळी त्याचा आढावा घेतला जाईल.

ते पुढे म्हणाले की, अकोट तालुक्यात व इतर तालुक्यांतही  वर्गखोल्या शिकस्त असल्याने पाडण्यात आल्या. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कक्ष नाहीत. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. मनरेगा, जिल्हा नियोजन निधी आदींतुन कालमर्यादित कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीने पूर्ण करावे.
जिल्ह्यात दुग्धोत्पादन विकासासाठी मुरघास, वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव द्यावा.
जलयुक्त शिवार योजना टप्पा २ मध्ये १ हजार ६७४ कामे नियोजित आहेत. यापूर्वीच्या कामांतील गेटचे काम पूर्ण करून घ्यावे. वाढीव निधीची गरज असल्यास प्रस्ताव द्यावा.

जलजीवन मिशनमध्ये जीवन प्राधिकरण व जि. प. कडून सुरू असलेल्या कामांची सद्य:स्थिती, खर्च, नकाशे, झालेली कामे आदी  माहिती देणारे फलक पुढील १५ दिवसांत लावावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण, वने, आदिवासी विकास आदी विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news