तिकीट कापण्याचा भाजपला फटका; प्रभाग १३ (ड) १३ (ड) मध्ये अपक्ष आशिष पवित्रकारांचा निर्णायक विजय
“गड आला, पण सिंह गेला” प्रभाग १३ मधील अपक्ष विजयाने राजकीय वर्तुळात खळबळ प्रभाग क्रमांक १३ मधून मनपा निवडणुकीत एकमेव विजयी अपक्ष उमेदवार म्हणून आशिष पवित्रकार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला असून, या विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रभागात ठाण मांडून बसलेल्या एका दिग्गज नेत्याला मात्र या निकालामुळे तीव्र खंत व्यक्त करावी लागत असून, ते सर्वत्र “गड आला, पण सिंह गेला” अशी प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या नेत्याने प्रभाग १३ मध्ये तळ ठोकून प्रचार केला होता. जागोजागी सभांमधून आशिष पवित्रकार यांना पराभूत करण्याचे खुले आव्हान देत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आपले संपूर्ण पॅनल मोठ्या बहुमताने विजयी होईल, असे स्वप्नही त्यांनी पाहिले होते. मात्र, आशिष पवित्रकार आणि त्यांच्या समर्पित टीमने कल्याण गल्ल्यांपासून ते शिवरपर्यंत प्रत्येक भागात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधला. अथक प्रचार, नियोजनबद्ध संपर्क आणि जनतेशी असलेले नाते यांच्या बळावर त्यांनी हा विजय “वाघाच्या जबड्यातून खेचून आणला”, असेच राजकीय जाणकारांचे मत आहे. या पराभवाची धास्ती घेत संबंधित नेते आता उघडपणे खंत व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार हे येणाऱ्या मनपा राजकारणात ‘किंगमेकर’ ठरू शकतात, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. एकमेव विजयी अपक्ष उमेदवार ठरलेले आशिष पवित्रकार आता नव्या जोमाने प्रभागातील विकासकामांवर भर देणार असून, भविष्यात आमदारकीच्या लढतीसाठी सज्ज होत असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक १३ मध्ये आतापासूनच सुरू झाली आहे.
एकूण पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 80 – बहुमताचा आकडा : 41
- भाजप : 38
- काँग्रेस : 21
- उबाठा : 06
- शिंदे सेना : 01
- अजित राष्ट्रवादी : 01
- शरद राष्ट्रवादी : 03
- वंचित : 05
- एमआयएम : 03
- अपक्ष : 02

