अकोल्यातील मोठी उमरी परिसरात भरदिवसा थरार; युवकावर प्राणघातक हल्ला

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात आज भरदिवसा थरारक घटना घडली. दुचाकीवरून जात असलेल्या 25 वर्षीय ओम राऊत या युवकाला अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून काठ्या व कठोर वस्तूंनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला.
ही घटना मोठी उमरी येथील रवणक मंगल कार्यालयासमोर घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात ओम राऊत गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, जुने वैर किंवा अन्य कारणामुळे हा हल्ला झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
