
अकोला, ता. २१ : गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. या बहुचर्चित प्रकरणात श्रीराम गावंडे यांच्यासह दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. किशनराव हुंडीवाले हे ६ मे २०१९ रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास शैक्षणिक संस्था व मालमत्ता वादातून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची सुरुवात तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केली. त्यानंतर बालापूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने-पाटील तसेच पोलिस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत एक हजारांहून अधिक कागदपत्रांची सविस्तर आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस व विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपींच्या निर्दोष मुक्ततेची विनंती न्यायालयाकडे केली होती. अंतिम निकालात न्यायालयाने श्रीराम गावंडे, रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
