मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात : दोन ट्रकची समोरासमोर धडक, दोन्ही चालक जागीच ठार
वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने वाहतूक सुरळीत

कुरणखेड :
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुरणखेडजवळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुरणखेड विभागानजीक पैलपाडा पेट्रोल पंपासमोर शनिवार (ता. 24) मध्यरात्री दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
मूर्तिजापूर येथून अकोल्याच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक NL-01-AK-1105) आणि समोरून येणारा ट्रक (क्रमांक MH-28-BB-3667) यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकचे चालक वाहनातच अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक असल्याने ओळख पटवणे कठीण झाले होते.
मृत चालकांपैकी एकाचे नाव जगजीत सिंग (रा. यवतमाळ) तर दुसऱ्या चालकाचे नाव देविदास नारायणन (रा. जळका भडंग, खामगाव) असे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पथकाने मोठ्या कसरतीने अथक परिश्रम घेतले. त्यानंतर 1033 अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने काही तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत केली.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.
मदत कार्यात सहभागी :
वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख विजय माल्टे,
शाहबाज शहा, उमेश माल्टे, अक्षय मोरे,
पैलपाडा येथील आपत्कालीन पथकाचे रंजीत घोघरे, विरू देशमुख, राम उमाळे
यांनी मृतदेह बाहेर काढणे व वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
जीव रक्षक : योगेश विजयकर
वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक
हेल्पलाईन क्रमांक : 7030086770
