इराण इस्त्रायल युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारतात सध्या तरी पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीयेत. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील इंधन साठ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे सध्या पुढील २५ दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा आणि शुद्ध इंधनाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तात्काळ वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये, यासाठी खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. तसेच इंधन आयातीसाठी पर्यायी आणि नवीन बाजारपेठांचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.
