मूर्तिजापूर ग्रामीणचे दोन पोलीस कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

अवैध दारू विक्रीसाठी मागितली होती लाच; अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
अकोला/मूर्तिजापूर: अवैध दारू विक्रीचा व्यवसाय विनासायास सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी ताब्यात घेतले. बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके अशी या कर्मचाऱ्यांची नावे असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम अनभोरा येथे तक्रारदाराचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी संबंधित बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अकोला एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
असा फसला सापळा तक्रार प्राप्त होताच एसीबी पथकाने प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला ३ हजार रुपये मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. एसीबीने सापळा रचला असताना, आरोपींना कारवाईची कुणकुण लागली आणि त्यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, पुराव्यांच्या आधारे एसीबीने तत्परता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलीस दलात खळबळ सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे व त्यांच्या पथकाने केली. रक्षकच भक्षक बनत असल्याच्या या प्रकारामुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबी अधिक तपास करत आहे.
