अकोला
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३ नोव्हे. २०२५ रोजी करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी अकोला शहरातील एकूण २० परीक्षा केंद्राची निश्चिती करण्यात आली असून सदर परीक्षा पेपर क्र. १ सकाळी १०:३० ते १:०० व पेपर क्र. २ दुपारी २:३० ते ५:०० कालावधीत घेण्यात येणार आहे. पेपर क्र. १ साठी एकूण १४ केंद्र निश्चित असून ४२०० परीक्षार्थी व पेपर क्र. २ साठी एकूण २० केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून एकूण ५५९४ असे एकूण ९७९४ परीक्षार्थी परीक्षेला प्रविष्ठ होणार आहेत. ९७९४ पैकी १५९ परीक्षार्थी हे दिव्यांग असून त्यांना नियमानुसार अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच परीक्षार्थींना ओळखीचा पुरावा व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
सदर परीक्षेच्या आयोजनासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तर परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठीत केली असून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, अकोला) या समितीच्या उपाध्यक्ष आहेत. तर सदस्य सचिव म्हणून मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.) कार्यालयामध्ये जिल्हा सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
परीक्षेच्या प्रत्यक्ष अंबलबजावणी साठी १ जिल्हा परिरक्षक, ५ झोनल अधिकारी, २० सहा. परिरक्षक, २० केंद्रसंचालक, ५२ पर्यवेक्षक, २४१ समवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी परीक्षार्थींना बायोमेट्रिक सिस्टीम, फेस स्कॅनिंग, मेटल डिटेक्टर यांच्या तपासणीतून जावे लागेल. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर व प्रत्येक वर्गखोली मध्ये सर्व परीक्षार्थी हे AI तंत्रज्ञानावर आधारित LIVE CCTV च्या निगराणीत असणार आहेत. यावर्षी नव्यानेच सर्व परीक्षार्थी यांचे “फोटो व्ह्यू” सिस्टीमद्वारे तपासणी होणार आहे. यामुळे डमी उमेदवार ओळखण्यास मदत होणार आहे. तसेच “कनेक्ट व्ह्यू” या तंत्रज्ञानाद्वारे सर्व केंद्र संचालक, जिल्हा सनियंत्रण कक्ष व परीक्षा परिषद पुणे यांच्यात हॉट लाईन ची सुविधा उपलब्ध होणार आहे. सेंटर कोड डायल करताच क्षणात संपर्क साधता येणार आहे. दिवसभर सूचना देण्याची आणि प्राप्त करण्याची नोंद स्वयंचलीतरित्या जतन होणार असल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व नियंत्रण येणार आहे. परीक्षा परिषदेच्या या नव्या पावलांमुळे यंदाची TET इतिहासातील सर्वाधिक कडक नियमनाखाली घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सदर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या भरारी पथकाची केंद्रावर नजर राहणार असून शिक्षणाधिकारी (प्राथ.) हे भरारी पथकासह संपूर्ण परीक्षेचे नियंत्रण अधिकारी म्हणून परीक्षेच्या संपूर्ण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. परीक्षापूर्व आयोजनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक व समवेक्षक यांची आढावा सभा मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष्यतेखाली दि. २०-११-२०२५ सकाळी ११:०० वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा अंतर्गत एकूण २० परीक्षा केंद्र व प्रविष्ठ परीक्षार्थी यांची यादी खालीलप्रमाणे आहे.


