अकोल्यात रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई! तारफैल आणि नायगाव परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम आज सकाळपासून सुरू.
अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या तारफैल आणि नायगाव परिसरात रेल्वे प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे लाईनलगत असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे या मोहिमेच्या कक्षेत काही धार्मिक स्थळांचाही समावेश असल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला शहरातील तारफैल आणि नायगाव परिसरात अनेक वर्षांपासून रेल्वेच्या मालकीच्या जागेवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यात येत आहेत.
कायदो व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या कारवाईबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून काहींनी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
विशेष बाब म्हणजे रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या काही धार्मिक स्थळांचाही या अतिक्रमण हटाव मोहिमेत समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात संवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेसाठी तसेच भविष्यातील विकासकामांसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तारफैल आणि नायगाव परिसरात दिवसभर हालचालींना वेग आला असून नागरिकांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.
———————————————–
प्रतिनिधी शाम वाळस्कर
सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर

