अकोला, दि. 27 ऑगस्ट 2026 : महिला व बाल विकास विभाग, अमरावती विभागांतर्गत अकोला येथील शासकीय महिला राज्य गृह येथे निराधार, निराश्रित, पीडित तसेच हरविलेल्या महिलांना निवारा व आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. अशाच प्रकारे एका हरविलेल्या महिलेला पोलिसांमार्फत महिला राज्य गृह येथे दाखल करण्यात आले होते. सदर महिला अत्यल्प बोलत असल्याने तसेच तिला स्वतःच्या गावाचे अथवा कुटुंबाचे नाव-पत्ता सांगता येत नसल्याने तिच्या कुटुंबाचा शोध घेणे मोठे आव्हान होते.
महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांच्या मार्फत महिला राज्य गृह येथे आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सदर महिलेची आधार नोंदणी करण्यात आली. मात्र आधार कार्ड प्राप्त न झाल्याने सुनील लाडूलकर यांनी आधार ग्राहक सेवा प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यावेळी सदर नोंदणी डुप्लिकेटमध्ये दर्शविल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली.
सुमारे 15 दिवसांनंतर महिलेचा जुना नामांकन क्रमांक प्राप्त झाला. हा क्रमांक UIDAI च्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला. तेथून आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर महिलेचे बोटांचे ठसे घेऊन आधार कार्ड डाउनलोड करण्यात यश आले. आधार कार्डवरील पत्त्यावरून सदर महिला आदिलाबाद जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
महिलेच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी सुनील लाडूलकर यांनी आदिलाबाद जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून महिलेचे छायाचित्र व आधार कार्डाची प्रत पाठविली. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी तपास करून महिलेच्या कुटुंबाचा शोध घेतला. संबंधित ठाणेदारांनी सुनील लाडूलकर यांच्याशी संपर्क साधून महिलेचे पती व भाऊ पोलिस ठाण्यात उपस्थित असल्याची माहिती दिली.
यानंतर महिला राज्य गृह येथे जाऊन सुनील लाडूलकर यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून महिलेचा तिच्या पती व कुटुंबीयांशी संपर्क घडवून आणला. अनेक दिवसांनंतर आपल्या कुटुंबीयांना पाहून महिला व तिचे कुटुंबीय भावूक झाले.
महिला राज्य गृहच्या अधीक्षिका जयश्री हिवराले यांनी महिलेच्या पतीला पुढील पुनर्वसन व कुटुंबाकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती दिली. त्यानुसार दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी महिलेचे पती, मुलगी व भाऊ अकोला येथे उपस्थित झाले. आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते सदर महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी महिलेचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. आधार नोंदणीपासून ते UIDAI कार्यालयाशी संपर्क, आधार क्रमांक प्राप्त करणे, आधारवरील पत्त्याच्या आधारे आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधणे आणि अखेर कुटुंबाशी संपर्क घडवून आणणे या सर्व प्रक्रियेमध्ये सुनील लाडूलकर यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे दिसून आले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, गिरीश पूसडकर, महिला राज्य गृह अधीक्षिका जयश्री हिवराले, परिवेक्षिका अधिकारी विद्या देशमुख राजू लाडूलकर, सुनील लाडूलकर तसेच महिलेचे नातेवाईक उपस्थित होते.
हरविलेल्या व निराधार महिलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पुन्हा पोहोचविण्यासाठी आधार नोंदणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय किती महत्त्वाचा ठरतो, याचे हे उल्लेखनीय उदाहरण आहे. पाच वर्षांनी आपल्या बहिणीची तसेच पत्नीची आईची व मुलीची भेट झाल्यावर परिवाराच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते.. त्यांनी शासकीय महिला राजगृह मधील कर्मचारी व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले..

