अल्पवयीन मुलीवर कुटुंबीय व शेजाऱ्याकडून अत्याचार; दोघांना अटक, एक फरार
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
सततच्या त्रासामुळे पीडित मुलीने शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडे आपबीती सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक गणेश ठाकरे आणि चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत वडील, काका आणि शेजारी राहणाऱ्या वृद्धाविरोधात POCSO कायदा व भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे नोंदवले. गुन्हा क्रमांक 382/25 अंतर्गत कलम 64(2)(f),(m), 65(1) BNS तसेच बाल संरक्षण कायद्याच्या कलम 4, 6 आणि 8 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या वृद्धाला अटक करण्यात आली असून वृद्धाचे नाव गजानन भोम असल्याची माहिती आहे. काका सध्या फरार असून तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलीचे वय 12 वर्षे 8 महिने 22 दिवस असून ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्यावर वारंवार अत्याचार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत.
