पातूर (प्रतिनिधी):
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तळीरामांना ‘बनावट’ झिंग देण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला आहे. पातूर-वाशिम रोडवरील चिचखेड शिवारात एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून प्रशासनाने तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अकोला जिल्ह्यातील अवैध दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शेतात पिकत होती ‘बनावट’ नशा
मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फर खान यांच्या शेतातील एका झोपडीवजा गोदामात ‘टँगो पंच’ आणि ‘रॉकेट’ यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट देशी दारू तयार करून तिचा साठा केला जात होता. बनावट दारूच्या बाटल्या, बूच आणि इतर साहित्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले. अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या या उद्योगाची खबर जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांना लागताच त्यांनी तातडीने चक्र फिरवली आणि हा साठा जप्त केला.
३० ते ४० लाखांचा माल, पण ‘मालक’ गायब
या छाप्यात पथकाला दारूचे बॉक्स आणि साहित्याचा डोंगरच आढळला. रात्री उशिरापर्यंत या साठ्याचे मोजमाप सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार हा साठा ३० ते ४० लाखांच्या घरात आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मुख्य सूत्रधार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. आता हा ‘नशा’ बनवणारा नेमका कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
कारवाईचा धडाका
ही कारवाई जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांबळे, सोनार, भुरळ व त्यांच्या भरारी पथकाने केली. “आम्ही या अवैध व्यवसायाचे मूळ शोधत आहोत. आरोपी लवकरच जेरबंद होतील,” असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

