सिंदखेडराजा …..
प्रेमी युगालाची एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना साखरखेर्डा शिवारात आज 22 डिसेंबर 2023 रोजी उघडकीस आली. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने अखेर या प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळ्यात गळे घालून दोघांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या घटनेतील मुलगी केवळ ८ व्या वर्गात शिकणारी १३ वर्षाची विद्यार्थिनी आहे. दोघेही गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता होते.
प्राथमिक माहितीनुसार मुलीचे नाव साक्षी संतोष अंभोरे (१३ वर्ष रा. शेंदुर्जन) असे आहे तर मुलाचे नाव गोपाल समाधान खिल्लारे(२२) असे आहे. दोघेही शेंदुर्जन येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. साखरखेर्डा शिवारातील एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही १८ डिसेंबर पासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने १८ डिसेंबरला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून त्याच दिवशी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान आज २२ डिसेंबरला संध्याकाळी एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघांची ओळख पटली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमात अडथळा येत होता, त्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. गेल्या ४ दिवसांपासून दोघे गायब असल्याने त्यांनी आत्महत्या कधी केली याबाबत अस्पष्टता आहे.