जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला

अकोला, दि. 21 : बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कार्यवाहीत रोखण्यात आला. आता मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करून देणार नाही, असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील निंभारा गावात एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मंगळवारी (20 फेब्रुवारी) मिळाली. त्यानंतर कक्षातर्फे पथकाने तत्काळ या गावात जाऊन माहिती घेतली. बालविवाह होणार असल्याची खातरजमा झाल्यावर पथकाने मुलीच्या पालकांची भेट घेतली व मुलीचे वय 18 वर्षांहून कमी असल्याने आपण लग्न लावून दिल्यास आपल्यावर बालविवाह अधिनियम 2006 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न लावून देणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. त्यामुळे हा बालविवाह रोखला गेला. या कार्यवाहीप्रसंगी संरक्षण अधिकारी सुनील सरकटे, सचिन घाटे, समुपदेशक शंकर वाघमारे, शुभांगी लाहुडकर, सरपंच नीलेश खरात आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी मार्गदर्शन केले.

लग्नासाठी मुलीचे वय 18 व मुलाचे 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. बालविवाह केल्यास कायद्याने गुन्हा ठरतो व दोन वर्षांचा कारावास व एक लाख रू. पर्यंतचा दंड होऊ शकतो. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले. अधिसूचनेनुसार ग्रामीण स्तरावर ग्रामसेवक यांना, तसेच शहरी स्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news