
आज देशभरातील सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर गेले असून, त्याचा अकोला शहरातही मोठा परिणाम पाहायला मिळाला. सकाळपासूनच विविध बँकांच्या शाखांसमोर कर्मचारी आंदोलन करताना दिसून आले.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आज एक दिवसीय संपाची घोषणा केली होती. त्यानुसार अकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, डोक्यावर टोप्या घालून व हातात झेंडे घेऊन त्यांनी निदर्शने केली.
या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसीय कामकाजाची (5-Day Working) प्रमुख मागणी करण्यात आली. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बँका बंद असतात. मात्र, आठवड्यातून पाच दिवस कामकाज लागू करण्याची संघटनांची मागणी असून, त्याबदल्यात दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास कर्मचारी तयार असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले.
सरकारने याबाबत तात्काळ अधिकृत अधिसूचना जारी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, संपामुळे बँकांमधील रोख व्यवहार, धनादेश क्लिअरन्ससह इतर महत्त्वाची कामे ठप्प झाली असून, ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
