अकोल्यात मध्यरात्री अग्नितांडव! सिटी कोतवाली परिसरातील ६ दुकाने जळून खाक!

अकोला: अकोला शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सिटी कोतवाली चौकात शनिवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. महानगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या परिसरात असलेल्या ‘बिंदी घर’सह इतर सहा दुकानांना पहाटे ३ ते ३:३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सहाही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
शाळा बंद असल्याने अनर्थ टळला
ज्या ठिकाणी आग लागली, त्या परिसराला लागूनच महापालिकेची उर्दू शाळा आहे. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे आणि शाळेत विद्यार्थी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, याच परिसरातील ‘बिंदी घर’सह इतर अनधिकृत दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकतीच कारवाई केली होती. हा परिसर अत्यंत रहदारीचा असून, रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाची वेळेवर धाव
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. यावेळी महापालिकेचे प्रादेशिक अधिकारी, अग्निशमन कर्मचारी आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे अकोला शहरातील महापालिकेच्या खुल्या जागांवर होत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या शाळा आणि मोकळ्या भूखंडांवर अवैध बांधकामे झाली असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ही अतिक्रमणे तत्काळ काढून जागा मोकळी करण्याची मागणी आता सामान्य जनतेतून होत आहे. आता याकडे सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
