धक्कादायक: अकोल्यातील त्या ‘गूढ’ रुग्णाभोवती पोलिसांचा वेढा; माना पोलिसांकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न!
अकोला/माना: अकोला शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला एक ‘विशिष्ट’ रुग्ण सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या रुग्णाच्या कक्षाबाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा असल्याने हा रुग्ण कुणी साधासुधा नसून, एखाद्या मोठ्या गुन्हेगारी किंवा संवेदनशील प्रकरणाशी संबंधित असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त असतानाच, माना पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर मौन पाळल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या रुग्णाला अकोल्यातील एका प्रतिष्ठित रुग्णालयात अत्यंत गुप्तपणे दाखल करण्यात आले. रुग्ण दाखल झाल्यापासून त्या ठिकाणी साध्या गणवेशातील आणि वर्दीतील पोलिसांचा राबता वाढला आहे. हा रुग्ण नेमका कोण? त्याला कोणत्या गुन्ह्याखाली किंवा संशयावरून ताब्यात घेतले आहे? आणि त्याच्या उपचाराचा खर्च कोण उचलत आहे? असे अनेक प्रश्न अकोलेकरांच्या मनात घोळत आहेत.
सत्य लढाला ‘माना’ पोलिसांची उडवाउडवीची उत्तरे
या गंभीर प्रकरणाचे धागेदोरे माना पोलीस स्टेशनशी जोडले गेल्याची माहिती मिळताच, ‘दैनिक सत्य लढा’ टीमने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नावकार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. १२ मार्च रोजी घडलेल्या नेमक्या प्रकाराबाबत विचारणा केली असता, नावकार यांनी अत्यंत बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले.
ही घटना घडून तीन दिवस उलटले असूनही, “मी सविस्तर माहिती घेऊन सांगतो,” अशी उत्तरं देऊन त्यांनी पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस उपनिरीक्षकाला आपल्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती नसावी, ही बाब आश्चर्यकारक असून, मुळात हे प्रकरण दडपण्याचाच हा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कर्तव्यशून्य अधिकाऱ्याच निलबंन होणार का?
जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट किंवा संवेदनशील असते, तेव्हा पोलीस प्रशासनाने पारदर्शकता राखणे अपेक्षित असते. मात्र, पीएसआय नावकार यांच्यासारखे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करून संशयाचे वातावरण अधिक गडद करत आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी किंवा प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठीच ही ‘फिल्डिंग’ लावली जात आहे का, असा सवाल आता जनता विचारत आहे.
एकीकडे अकोल्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, दुसरीकडे पोलीस अधिकारी माहिती लपवून संभ्रम निर्माण करत असतील, तर अशा कर्तव्यशून्य आणि उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्याची तात्काळ निलबंन व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दडपशाहीचा प्रयत्न फसेल?
या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे की त्याला ‘संरक्षण’ दिले जात आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पोलिसांच्या या गूढ व्यवहारामुळे संशयाची सुई माना पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीकडे वळली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.

