मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राज्यातील साधारण 20 जिल्ह्यांतील काही नगरपालिकांच्या तसेच काही प्रभागांच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना वाढली आहे.
या जिल्ह्यांमध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
अकोला
राज्यातील निवडणुक प्रक्रिया स्थगित झालेल्या 20 नगरपालिकांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय. नगराध्यक्ष पदासह सर्व 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. आता 20 डिसेंबरला येथे निवडणूक होणार आणि 21 डिसेंबरला मतमोजणी. निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

