विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार – जिल्हाधिकारी अजित कुंभार

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा
विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 30 : जिल्हा वार्षिक योजनेत नियोजनानुसार विहित कालावधीत निधी खर्च होणे आवश्यक आहे. विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिला.
जिल्हा वार्षिक योजनांबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, विकासकामांवरील नियोजित निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. अनेक विभागांकडून अद्यापही प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभाग अशा कृषीपूरक व्यवसायांशी संबंधित विभागांकडून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगली विकासकामे व अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तथापि, त्यानुसार मागणी प्राप्त झालेली नाही. कामांसाठी अद्यापही प्रशासकीय मान्यता न मिळवलेल्या विभागांनी दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करावी व विकासकामांना चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, ज्या विभागांकडून विहित वेळेत निधी पूर्णत: खर्च होणे शक्य नाही, त्यांनी तसे तत्काळ कळवावे जेणेकरून हा निधी अन्य आवश्यक विकासकामांकडे वळविता येईल. मात्र, ही कार्यवाही त्वरित व्हावी. वेळेवर निधी अखर्चित राहिल्याचे आढळल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी प्रत्येक नियोजित काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी उपयोजना व विशेष घटक निधीतून नियोजित कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news