केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

अकोला, दि. २१ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरूवारी (२३ नोव्हेंबर) मूर्तिजापूर (जि. अकोला) येथे येत आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : कारंजा लाड येथून हेलिकॉप्टरने दु. १.४० वा. मूर्तिजापूरकडे प्रयाण, दु. २.१० वा. मूर्तिजापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेनजिक हेलिपॅड येथे आगमन, दु. २.२० वा. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण, दु. ३.२० वा. हेलिपॅडकडे प्रयाण, दु. ३.३५ वा. मूर्तिजापूर येथील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण.


राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण

अकोला, दि. २१ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती- चिखली पॅकेज एक व दोनमधील चौपदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरूवारी (२३ नोव्हेंबर) मूर्तिजापूर येथे दु.२.२० येथे होणार आहे.

पॅकेज एकमधील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड या ५४ किमी लांबीच्या, तसेच पॅकेज दोनमधील कुरणखेड ते शेलाड या ५० किमी लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण होईल. या दोन्ही कामांचे मूल्य अनुक्रमे ९१२.४१ कोटी व ८१७.३५ कोटी रू. आहे.

अमरावती ते कुरणखेड टप्प्यात २ मोठे पूल, ४८ कल्व्हर्ट, २ वाहन भुयारी मार्ग,५ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे. कुरणखेड ते शेलाड टप्प्यात ४ मोठे पूल, ५६ कल्व्हर्ट, ११ वाहन भुयारी मार्ग, ४ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.

बाळापूर येथील बाळादेवी संस्थान, डोंगरगाव येथील अंबादेवी संस्थान, काटेपूर्णा येथील चंडिकादेवी मंदिर, माना येथील रामकृष्ण मंदिर, जैन मंदिर अशा धार्मिक स्थळांबरोबरच काटेपूर्णा अभयारण्य व अनेक महत्वाच्या ठिकाणी जलद पोहोचणे या महामार्गामुळे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे, अकोला- मूर्तिजापूर या कापूस उत्पादक प्रदेशाचा कापडनिर्मिती होणा-या सुरत, नागपूर अशा शहरांशी वेगवान संपर्क होईल.

बोरगाव मंजू येथे ४.७०० किमी लांबीचा बायपासमुळे तेथील शहरातून जाणा-या वाहनांची गर्दी कमी होईल व वाहतूक सुरळीत होईल. प्रवासातील वेळही वाचणार आहे.  या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होणार आहे.

अमृत सरोवर योजनेंतर्गत मूर्तिजापूर ते अकोला परिसरात २१ सरोवरांची निर्मिती झाली. या कामातील मुरूम, मृदेचा वापर महामार्गासाठी झाला. महामार्गनिर्मितीबरोबरच जलसंधारणाचे कार्य याद्वारे साधले गेले.

अकोला ते वाशिम, अकोट, अकोला ते बार्शिटाकळी, मूर्तिजापूर ते कारंजा लाड, शेगाव या रस्त्यांशी महामार्ग जोडलेला असल्याने सर्वदूर दळणवळणाला गती मिळणार आहे. वाहन भुयारी मार्ग, पूल, पादचारी मार्ग यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन वाहतूक सुरळीत होईल व

अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news