राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा; मतदान केंद्रांना भेट

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा; मतदान केंद्रांना भेट
मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

अकोला, दि. २९ : मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व अचूक व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.
मतदार यादीविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक डॉ. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
यावेळी मतदार यादी निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मतदाराच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी व आक्षेपांबाबत दावे-हरकती आदी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी. सर्व पक्ष प्रतिनिधींना यादी, तसेच आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक डॉ. पाण्डेय यांनी दिले. मतदार यादीबाबत काही म्हणणे असल्यास भ्रमणध्वनी क्र. 9209181138 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सादरीकरण केले. एकाहून अधिक नोंदी असलेल्या किंवा मयत नावांच्या वगळणीची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होईल. जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रमात नवमतदारांसाठी ७०, सर्व वयोगटासाठी ७, भटक्या विमुक्त जमातीसाठी १२, दिव्यांगांसाठी ३, तृतीयपंथीसाठी ३ विशेष शिबिरे घेण्यात आली. सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणीही शिबिरे घेण्यात आली. अशा एकूण १७८ शिबिरांचे आयोजन करून ५ हजार ७९२ फॉर्म गोळा करण्यात आले. त्याशिवाय, मतदार जनजागृती गीत, दोन मोबाईल व्हॅन, सायकल रॅली, महापालिका व नगरपरिषदांच्या एकूण १२० घंटागाड्या, ठिकठिकाणी फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली, अशी माहिती  जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिली.
विविध मतदान केंद्रांना भेट
मतदार यादी निरीक्षक डॉ. पाण्डेय यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली. त्यांनी मूर्तिजापूर मतदारसंघातील अंभोरा, बाळापूर मतदारसंघातील  रिधोरा, तसेच अकोला शहरातील सीताबाई कला महाविद्यालय येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
बैठकीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्यासह रिधोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील तीन केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांची रचना, तेथील सुरक्षितता, मतदारांसाठी, तसेच दिव्यांग मतदारांशी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांशी त्यांनी चर्चा केली  व माहिती घेतली. समन्वय अधिकारी श्री. म्हस्के, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पी. बी. धोटे, सुधीर बचे, किशोर पुंडे, पर्यवेक्षक गजानन इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांचे स्वागत केले. आयुक्तांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news